: अभियंत्यासह पत्नी, मुलीवर गुन्हा
सांगली (प्रतिनिधी) : शासकीय सेवेतील पदाचा गैरवापर करून 1 कोटी दोन लाख एकशे तेरा रुपये इतकी संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमा केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर राहुल विठ्ठल खाडे, (शाखा अभियंता छोटे पाटबंधारे विभाग, जि. प. सांगली ) याच्यासह त्याची पत्नी सरोजनी खाडे आणि विशाखा खाडे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. राहुल खाडे हा गेल्या दहा वर्षापासून पत्नी मुलीसह फरार आहे.
शाखा अभियंता राहुल विठ्ठल खाडे, (रा. रामकृष्ण परमहंस सोसायटीचे जवळ, जगदाळे प्लॉट, पोळ मळा सांगली) यांनी भ्रष्ट व गैर मार्गाचा अवलंब करुन संपत्ती कमवली असल्याबाबतचा तक्रार लाचलुचपत विभागाच्या कार्यालयास प्राप्त झाला होता. प्राप्त तक्रारी अर्जाचे अनुषंगाने राहुल खाडे याच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत शाखा अभियंता राहुल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सरोजिनी राहुल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी दि.७.११.१९८९ ते दि.२८.२.२०१५ या परिक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्त्रोताच्या विसंगत प्रमाणात १०२००११३/- रुपये (एक कोटी, दोन लाख, एकशे तेरा, रुपये) (९३ टक्के) इतकी संपत्ती भ्रष्ट मार्गाने गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. राहुल खाडे यांनी भ्रष्ट व गैर मार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी सौ. सरोजिनी राहुल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी त्यांना मदत केली असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने राहुल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सरोजिनी राहुल खाडे व मुलगी विशाखा राहुल खाडे यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाणे जि. सांगली येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राहुल खाडे व त्याची पत्नी सरोजिनी राहुल खाडे यांचेवर विश्रामबाग पोलीस ठाणे जि. सांगली येथे भाग-५ गु.र.नं.१६१/२०१० भादविर्स कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे दि.१२.०७.२०१० रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यांतुन ते व त्यांची पत्नी जामीनावर मुक्त झाले पासुन ते व त्यांचे कुटुंबीय फरारी आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती डॉ. शितल जानवे / खराडे, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक यांनी केली आहे.