: प्राथमिक तयारी पूर्ण मात्र संभ्रम कायम
विटा (प्रतिनिधी) : खानापूर मतदार संघाचे आ. अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या खानापूर विधानसभेसाठी ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या आहेत, मात्र निवडणूक आयोगाकडून कोणताच आदेश नसल्याने लोकसभे सोबत पोटनिवडणूक होणार की नाही ? याबाबतचा संभ्रम कायम आहे.
आ. अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीबरोबरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. लोकसभेचे पडघम वाजले आहेत. सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. आगामी काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होईल. मात्र खानापूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकी संदर्भात कोणत्याही वेगळ्या हालचाली सुरू नसल्याचे समजते किंवा प्रशासनाला देखील स्पष्ट आदेश नाहीत.
विधानसभेची एखादी जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सह अन्य साहित्य एक महिन्यातच सज्ज ठेवण्यात येते. या पार्श्वभूमीवर खानापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून ईव्हीएम मशीन मागवण्यात आल्या आहेत. परंतु हा निर्धारित शासकीय कामकाजाचा भाग आहे. खानापूरच्या पोटनिवडणुकी संदर्भात स्पष्ट असे कोणतेही आदेश प्रशासनाला नसल्याचे समजते. त्यामुळे खानापूरची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकी बरोबर होणार की लोकसभेनंतर होणार ? याबाबतचा नागरिकातील संभ्रम कायम आहे.
निवडणुकीसाठी सज्जता
लोकसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात संपूर्ण तयारी झाली आहे. खानापूर विधानसभेचे पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन देखील आलेले आहेत. लोकसभेबरोबरच पोटनिवडणूक झाली तरी प्रशासन सज्ज आहे.
– विक्रम सिंह बांदल
प्रांताधिकारी, विटा