वाळवा ( रहिम पठाण ) : राज्यात लवकरच निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हालचालीना वेग आला आहे.या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेटींचा धडाका लावला आहे तर त्यांचे चिरंजीव व राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते प्रतिक पाटील यांनीही गावावर गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
या मतदारसंघात जयंत पाटील यांची घट्ट पकड आहे. सन १९९० ला पहील्यांदा जयंत पाटील यांनी निवडणूक लढवली व त्यावेळी त्यांनी स्व.आ.विलासराव शिंदे यांचा पराभव केला.तेंव्हा पासून त्यांनी १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ व २०१९ असे एकूण ७ वेळा या मतदारसंघावरती निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. या विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे एक वैशिष्ट्य असे की जयंत पाटील यांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत नविन उमेदवार पहावयास मिळाला आहे. त्यामुळे सक्षम असा विरोधक पहावयास मिळालाच नाही.
२०२४ निवडणुक हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख दावेदार असू शकतात. हा मतदारसंघ जर शिवसेनेला मिळाला तर तेच उमेदवार असू शकतात तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी आपला मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे तेही या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.
या मतदारसंघात आ. सदाभाऊ खोत, महाडीक गट यांची ही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जो पर्यंत निवडणूक जाहीर होऊन उमेदवार फायनल होत नाही, तोपर्यंत या मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरूच राहणार आहे.