सांगली ( राजेंद्र काळे ) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि चुरशीची पालखी शर्यत म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या विट्यातील पालखी शर्यतीचा थरार आज विजयादशमी निमित्त पाहायला मिळणार आहे. ही पालखी शर्यत शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
विट्यातील पालखी शर्यतीला मोठा इतिहास आहे. याबाबत एक आख्यायिका सांगण्यात येते. विटा शहरातील इराप्पा साखरे हे भक्त मूळस्थान येथील रेवणसिद्धाची पूजा आणि सेवा करण्यासाठी नित्यनियमाने मूळस्थान येथे जात. मात्र वयोमानानुसार थकल्याने त्यांना रेवणसिद्धाच्या सेवेसाठी जाता येत नव्हते. त्यानंतर श्री रेवणसिद्धांनी इराप्पा साखरे यांना साक्षात्कार दिला. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. इथून पुढे आता तू माझ्या भेटीसाठी येऊ नको. मीच वर्षातून चार वेळा तुझ्या भेटीसाठी विटा येथे येईन असे सांगितले. तेव्हापासून श्री रेवणसिद्ध विटा येथे साखरे यांच्या भेटीसाठी येत.
विजयादशमी दिवशी मूळस्थान येथील रेवणसिद्ध पालखीने येऊन श्री इराप्पा साखरे यांची भेट घेत. त्यांना दर्शन देत. देवाची आणि भक्ताची भेट झाल्यानंतर त्या काळात विटा शहरातील नागरिक, भाविक श्री रेवणसिद्धाला निरोप देण्यासाठी सायंकाळी वेशीपर्यंत म्हणजेच सध्याच्या लिंगायत स्मशानभूमीपर्यंत वाजत गाजत जात. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे.
त्यानंतर 1932 सालापासून विटा येथील तत्कालीन नगराध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी श्री रेवणसिद्धांच्या पालखी शर्यतीची परंपरा सुरू केली. विजयादशमीनिमित्त मूळस्थान गुंफा येथून आलेली रेवणसिद्धाची पालखी आणि दुसरी विटा येथील रेवणसिद्धाची पालखी अशा श्री रेवणसिद्धांच्याच दोन पालख्यांमध्ये आबासाहेब पाटील यांनी पालखी शर्यत सुरू केली.
विजयादशमीनिमित्त मूळ स्थान व विटा येथील दोन्ही पालख्यांची सायंकाळी पाचच्या सुमारास मारुती व विठ्ठल मंदिरासमोर आरती केली जाते. काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या येतात. पाहुणी पालखी असल्याने मूळस्थानच्या पालखीला पाच पावले पुढे थांबण्याचा मान असतो.
दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर आरती झाल्यानंतर शर्यत सोहळ्यास सुरुवात होते. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. आरती झाल्यानंतर विट्याची पालखी पळवण्यासाठी डाव्या बाजूला विटेकर तर मूळ स्थानची पालखी पळवण्यासाठी उजव्या बाजूला सुळेवाडीकर (रेवानगरकर) सज्ज असतात. या पालखी शर्यत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह देशातून लाखो भाविक उपस्थित राहतात. पालखी पळवण्यासाठी शहरातील युवक, आबालवृद्ध पुढे असतात. जी पालखी सर्वप्रथम सीमोल्लंघन (शिलंगण ) मैदानात पोहचते ती विजयी होते. पूर्वीपासून चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळ्याची परंपरा शहरवासीयांनी अखंडपणे जोपासली आहे. शेकडो वर्षांपासून मोठा भक्तिभाव व जातीय सलोखा राखून पालखी शर्यत सोहळा उत्साहात पार पडतो.
शर्यतीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पालख्या एकाच देवाच्या म्हणजेच श्री रेवणसिद्धाच्या असतात. पालखी पळवणारे शर्यत जिंकतात किंवा हरतात; मात्र देव कधी हरत नसतो.