विटा ( प्रतिनीधी ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वतः टेंभू स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव दिले आहे. म्हणजेच टेंभू योजनेबाबत स्व. आमदार अनिलभाऊंच्या योगदानावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. विरोधक याबाबत काय म्हणतात याला आता काहीच अर्थ नाही. याची आम्हाला पावलोपावली जाणीव होत आहे. विटा शहरात जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्हाला विटा शहरात मोठे मताधिक्य मिळण्याची खात्री आहे, असा विश्वास डॉ. शितल बाबर यांनी व्यक्त केला.
बाबर म्हणाल्या, सुहास बाबर यांना ताकद देणे आपले नैतिक कर्तव्य आहे. लाडकी बहिण, आनंदाचा शिधा अशा अनेक योजना शासनाने राबवल्या. सुहास भैय्यांनी विट्यासाठी ८७ कोटींची पाणी योजना आणि रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी आणला. लाडकी बहिण योजनेला विरोधकांनी कोर्टात आव्हान देण्याचे काम केले. स्व. अनिलभाऊंच्या पश्चात पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र आम्हाला अनिलभाऊ नसल्यासारखे वाटत नाही. समोर बसलेल्या जनतेमध्ये आम्हाला स्व. अनिलभाऊंचा चेहरा दिसतो. गावोगावी फिरताना स्व. अनिलभाऊंनी केलेली कामे आणि जोडलेली माणसे अनुभवायला मिळतात. सुहास बाबर यांच्यात आम्ही स्व. अनिलभाऊंना पहात आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची आपली जबाबदारी आहे, असेही डॉ. शितल बाबर म्हणाल्या.