मिरज ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीकडून पसरवलेले फेक नेरेटिव्ह आता महाराष्ट्रात कदापी चालणार नाहीत. महाराष्ट्रात महायुतीने आखलेल्या विकासाचा नेरेटिव्ह चालणार आहे. गेल्या १० वर्षात आदरणीय मोदीजींनी संविधानाचे रक्षण केले. त्याला अजिबात धक्का लागू दिला नाही. उलट ते अधिक सशक्त कसे होईल ? याला अग्रक्रम दिला असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, विधानपरिषद सदस्या, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
मिरज मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ (ता. मिरज) येथे पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, नीताताई केळकर, प्रकाश ढंग, स्वाती शिंदे, सुमनताई खाडे, बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांच्यासह पदाधिकारी नेते उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारण करताना समाजकारण करायचे ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळाले हे माझे भाग्य आहे. मुंडे साहेबांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावाशी नाते आहे. सुरेशभाऊ खाडे यांनी मुंडे साहेबांसोबत काम केले आहे. मुंडे साहेबांचा त्यांच्यावर जीव होता. आजही मुंडे साहेबांचा फोटो सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात आहे. मुंडे साहेबांचा फोटो आहे म्हणजे गरीब, वंचितांशी नाते आहे. सुरेशभाऊ खाडे यांनी या भागात मोठा विकास केला आहे. मी ग्रामविकास मंत्री असताना मतदार संघात निधी दिला आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता येत्या निवडणुकीत कमळ चिन्हा समोरील बटन दाबून राज्यात भाजप महायुतीला आणि मिरजेत सुरेशभाऊ खाडे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुष्पृष्टी करून ग्रामस्थांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. सभेला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
बेडग गावात मर्गुबाई मंदिराच्या चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मुंडे साहेबांनी येथील देवीच्या मंदिरात नवस केला होता. मी आता काय नवस करू, असे त्या म्हणताच कार्यकर्त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री होण्यासाठी, अशी मागणी केली. मात्र पंकजाताई मुंडे यांनी त्याबाबत न बोलता राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे अशी प्रार्थना देवीकडे करतो, असे सांगितले.