कडेगाव ( प्रतिनिधी ) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. साखर कारखाना येथील स्मारक स्थळी बुधवार दि.८ रोजी सकाळी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे जयंतीनिमित्त समाधीवर फुले अर्पण करून अभिवादन करणेत येणार आहे. तसेच ह. भ. प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे किर्तन आणि ज्ञानाई भजनी मंडळ रहिमतपूर यांची भजन सेवा होणार आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या डोंगर खोऱ्यातील सोनसळ या छोट्याशा खेडे गावात स्व. आ. डॉ. पतंगराव कदम यांनी जन्म घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये राज्याबरोबरच पुणे येथे शैक्षणिक संकुल सुरु करून ते संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील शैक्षणिक संकुलाद्वारे सर्वसामान्यांच्या मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली करून शिक्षण क्षेत्रामध्ये एक दीपस्तंभ उभा केला. तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, शेती, सहकार, जलसंधारण इ. क्षेत्रामध्येदेखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्व. आ. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी १९६७ साली राजकारणात प्रवेश केला आणि त्यांच्या कामाची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संचालकपदी निवड केली. त्यामधून स्व. आ. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी करीत असलेल्या जनसेवेमुळे त्यांचा संपूर्ण राज्यभर लोकसंपर्क वाढला गेला. सर्वसामान्यांना ग्रामीण भागात एस. टी. ची सुविधा उपलब्ध करून देऊन गाव तेथे एस. टी. ही संकल्पना राज्यभर राबविली.
त्यानंतर १९८५ सालापासून सांगली जिल्ह्यातील भिलवडी- वांगी मतदार संघातून व २००९ पासून पलूस – कडेगाव मतदार संघातून विधानसभेवर सात्तत्याने निवडून येऊन शालेय शिक्षण खात्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करणेची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करीत होते. त्यामध्ये उद्योग, सहकार, मह्सुल व पुनर्वसन आणि वनमंत्री म्हणून प्रत्येक खात्यावर उल्लेखनीय काम करणेच ठसा उमठवला आणि त्यातूनच उजाड ओसाड माळ रानावर साखर कारखाना उभा करणेचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात सन १९९४ साली प्रत्ययास येऊन सन १९९९ साली सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचा प्रथम चाचणी हंगाम मा. सोनियाजी गांधी यांचे शुभहस्ते घेणेत आला. कारखान्याच्या अनुषंगाने माळरानावर नंदनवन फुलवण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे आज दिसून येत आहे. तसेच त्यांचे एक स्वप्न होते कि, सोनहिरा साखर कारखाना देशात सर्वोत्तम दर देईल आणि सर्वोकृष्ट कारखाना म्हणून राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार प्राप्त करेल.त्यानुसार सोनहीरा कारखान्याने मा. आ. मोहनराव कदम यांचे कुशल नेतृत्वाद्वारे साहेबांचे स्वप्न सार्थ केले.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत असताना सातत्याने सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील तालुक्यांना ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैशाळ इ. योजना आवश्यकतेनुसार कार्यान्वयित ठेवण्यासाठी राज्यशासनामध्ये खंबीरपणे वेळप्रसंगी ताठर भूमिका घेऊन या योजना कार्यान्वित ठेवल्यामुळे आज रोजी दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसून येत आहे. याचे सर्व श्रेय स्व. आ. डॉ. पतंगराव कदम साहेब यांना द्यावेच लागेल. सामान्य जनतेच्या सर्वागीण विकासासाठी व तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचवण्यासाठी आपले साहेब नेहमीच प्रयत्नशील होते.
साहेबांचा स्वभाव सरळ, साधा, स्पष्ट वक्तेपणा असलेमुळे राज्यशासन दरबारी त्यांचा नेहमीच दरारा होता. अशाप्रकारे आपल्या साहेबांचे जीवन शेवटच्या क्षणापर्यंत केवळ सामान्य, गोरगरीब, दीनदलित जनतेच्या विकासासाठी खर्ची पडले आहे. तद्वतच आपले साहेब राज्य, देशपातळीवर कोठेही असले तरी त्यांचे लक्ष नेहमीच सांगली जिल्हा आणि पलूस कडेगाव तालुक्यातील सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी असायचे.