: सुहास बाबर यांची ग्वाही
:’भिकवडी (बु.) येथे विकास कामांचे उद्घाटन
विटा (प्रतिनिधी ) : संपूर्ण मतदारसंघ हेच आपलं कुटुंब मानून यापुढील काळात मतदारसंघातील प्रत्येक गावांना समान न्याय देण्याचा भूमिकेतून काम करणार असल्याची ग्वाही युवक नेते सुहास बाबर यांनी दिली . ते भिकवडी बु. शाळेच्या नवीन इमारत उद्घाटन समारंभ, कै. शांताबाई शिवाजी तामखडे यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी रामू तामखडे यांनी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तसेच जानकी पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू सानिका चाफे हिच्या सत्कार प्रसंगी आयोजित संयुक्त कार्यक्रमात बोलत होते.

बाबर म्हणाले, मतदारसंघातील लोकांनी 2014 साली जो विश्वास आमदार अनिलभाऊ यांच्यावर दाखवला त्या विश्वासास खरे उतरण्याचे काम आमदार अनिलभाऊ यांनी गेल्या 10 वर्षात केले. आम्ही त्यावेळी ज्या ज्या विकासाच्या संकल्पना लोकांना सांगून आम्हाला मत देण्याचे आवाहन केले. त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवून लोकांचे समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भाऊंनी कधीही कोणत्याही गावच्या बाबतीत दुजाभाव केला नाही. ज्या गावात आम्हाला मते कमी मिळाली त्याही गावांना निधीच्या बाबतीत आमदार अनिलभाऊ यांनी भरघोस निधी देऊन न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हीच परंपरा यापुढील काळातही चालू राहील. लोकांनीही गावातील मतभेद बाजूला ठेवून विकास कामांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खो -खो खेळातील अत्यंत प्रतिष्ठतेचा समजला जाणारा जानकी पुरस्कार हा भिकवडी बु. येथील सानिका चाफे या मुलीस मिळाल्याबद्दल तिचा यावेळी सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा निश्चितच गौरव केला पाहिजे. सानिका चाफे हिने या तालुक्यातील मुलींच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने जे यश संपादन केले त्यामुळे ती निश्चितच कौतुकास पात्र आहे, असे खेळाडू या भागातून घडले पाहिजेत त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी अभिवचन दिले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव डॉ. प्रशांत इनामदार , खानापूर पंचायत समितीचे माजी सभापती पै. हणमंतराव तामखडे, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भास्कर बापू पाटील, मा. चेअरमन पै. मारुती शेळके, किसन बरकडे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष मंडले, उपाध्यक्ष पै. राजेंद्र शेळके, संजय पाटील, अध्यक्ष रामहरी तामखडे, गोरख सुडके, नवनाथ सुडके, दत्ता पाटील, विकास तामखडे, दयानंद शेळके, रवी पाटील, सांगली जिल्ह्यातील सर्व खो-खो प्रेमी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिकवडी बु. च्या मुख्याध्यापिका सौ. विद्यादेवी नलवडे मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.