अब की बार 777 कोटी पार;खानापूरात ‘ निधीचा ‘ पाऊस

: मुख्यमंत्र्यांची सुहास बाबर यांना ताकद
: मतदार संघात निधीचा वर्षाव

सांगली/ विटा ( प्रतिनिधी ) : खानापूर मतदार संघातील 132 किलोमीटर लांबीच्या तीन रस्त्यांसाठी शासनाने 777 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा निधी मिळाला असून या माध्यमातून अत्यंत दर्जेदार रस्ते पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.

आ. अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघातील विकास कामांना खीळ बसणार का ? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र कौटुंबिक दुखातून सावरत युवा नेते सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी मतदार संघातील अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील आमदार बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सुहास बाबर, अमोल बाबर यांच्या पाठीशी मोठी ताकद उभा केली आहे.

स्वर्गीय आमदार बाबर यांनी मतदार संघातील प्रमुख तीन रस्त्यांसाठी 777 कोटी रुपयांचे निधीची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात आमदार बाबर यांचे निधन झाले. त्यानंतर सुहास बाबर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या तिन रस्त्यांसाठी 777 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीमधून विटा -लेंगरे- भुड खरसुंडी-  लेंगरेवाडी या 56 किलोमीटर रस्त्यासाठी 333 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. विटा- पारे -हातनूर -मांजर्डे- बस्तवडे या 33 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 191 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच खरसुंडी -बलवडी -तामखडी -घोटी खुर्द पारे -चिंचणी- चिखलगोठण ते आंधळी या त्रेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 252 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे. हा संपूर्ण रस्ता साडेसात मीटर रुंदीचा असून त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
मतदार संघाचे इतिहासात राष्ट्रीय महामार्ग किंवा मुख्य रस्ते सोडता अन्य रस्त्यांसाठी एकाच वेळी 777 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोलाची मदत केल्याचे बाबर यांनी सांगितले. इथून पुढील काळात देखील अनिलभाऊंनी हाती घेतलेली सर्व कामे पूर्णत्वास आणून मतदार संघाचा समतोल विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही, सुहास बाबर यांनी दिली.

याप्रसंगी माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, कृष्णात गायकवाड, माजी जि प सदस्य सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे, माजी नगरसेवक अमर शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *