विटा ( प्रतिनिधी ) : बौद्धिक क्षेत्रात प्रचंड सामर्थ्य आहे. या सामर्थ्यातूनच भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी युवा वर्गावर आहे. मात्र बौद्धिक सामर्थ्य आणि क्षमतेचा विकास होण्यासाठी सातत्यपूर्ण वाचन आवश्यक असल्याचे प्रतिपादन डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. एन. जे. पवार यांनी केले.
‘अमृतवेल पुस्तक वाचन व आकलन स्पर्धे’चे उद्घाटन लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालय विटा येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक, माजी आमदार सदाशिवराव पाटील होते. वाचनाचे महत्त्व सांगताना डाॅ. पवार म्हणाले, 2047 पर्यंत भारत एक महासत्ता म्हणून उदयास
येण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. हे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट युवा पिढीला करावे लागणार आहेत. त्यांना बुद्धीच्या क्षेत्रात काम करावे लागणार आहे. मात्र त्यावेळी ही स्वप्नपूर्ती साकारण्याची क्षमता युवा पिढीमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या पिढीची असून त्या दृष्टीनेच अमृतवेल वाचन व आकलन स्पर्धेसारखे उपक्रम आवश्यक आहेत.
अध्यक्षस्थानाहून बोलताना माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, सामाजिक कार्य हे पणतीसारखे असते. आपल्या प्रकाशातून किती दूरवर प्रकाश जाणार आहे याची तिला चिंता नसते, पण अंधार दूर करण्याचा तिचा संकल्प असतो, असेच कार्य अमृतवेल समूहाचे असून अमृतवेल वाचन उपक्रमातून ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य सुरू आहे.
अमृतवेलचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी स्पर्धेचे स्वरूप विषद केले. प्राचार्य निवास वरेकर यांनी स्वागत केले तर प्रा. मानसी जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य कोरे यांनी आभार मानले. यावेळी संपतराव पवार, संग्राम देशमुख, बाळासाहेब जाधव, पद्माकर यादव, पत्रकार दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेरणादायी मार्गदर्शन!
खानापूर तालुक्याचे सुपुत्र असलेल्या डाॅ. एन. जे. पवार यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अतिशय दैदीप्यमान कारकिर्द केली. ऐनवाडीसारख्या अतिशय छोट्या खेड्यातून आणि दुष्काळी परिस्थितीची चटके सोसून आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक ते कुलगुरूपर्यंतचा प्रवास करणाऱ्या डाॅ. पवार विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सध्यस्थितीत युवा पिढीचा जबाबदारी आणि ती पूर्ण करण्यासाठीचा रोडमॅप त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.