श्री रेवणसिद्धांचे नवीन मंदिर भाविकांसाठी खुले

विटा : येथे  रेवणसिद्धांचे परमभक्त साखरे कुटुंबीयांनी बांधलेले  भव्य दिव्य मंदिर.

: महाशिवरात्रीनिमित्त महाआरती
: भाविकांची मोठी गर्दी होणार

विटा ( प्रतिनिधी ) : श्री रेवणसिद्धांचे परमभक्त असलेल्या साखरे कुटुंबीयांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च करत विट्यातील रेवणनाथ नगर ( सोनार गल्ली ) येथे श्री रेवणसिद्धांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारले आहे. गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेले मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले असून हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. शुक्रवार 8 मार्च रोजी  महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात सकाळी साडेसात वाजता महाआरती होणार असून भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप साखरे यांनी केले आहे.

विट्यातील कै. इराप्पा साखरे हे रेवणसिद्धांचे परमभक्त होते. ते नियमितपणे मूळस्थान रेवणसिद्ध येथे जाऊन देवाची सेवा करत. पण वाढत्या वयामुळे त्यांना मूळस्थानी जाऊन पूजा करणे शक्य होत नव्हते. मात्र त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री रेवणनाथांनी त्यांच्या राहत्या घरात त्यांना दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला की, मी इथून पुढे तुझ्याकडे वर्षातून चार वेळा भेटीला येईल आणि आणि पंधरा दिवस मुक्कामी येईन असे सांगितले. त्यांनी त्यावेळी स्वयंभू मूर्ती , शिवपिंड  नंदी व पादुका  इराप्पा यांना दिल्या .

त्या मूर्तीची आजही रेवणसिद्ध मंदिर विटा (सोनार गल्ली) या ठिकाणी पूजा होते आणि वर्षातून चार वेळा मूळस्थान वरून श्री रेवणसिद्धांची पालखी विटा नगरीत येते. ही परंपरा  साखरे यांचे वंशज व मानकरी पुढे चालवत आहेत. ज्या घरात देवाने  इराप्पा साखरे यांना दर्शन दिल्याचे सांगण्यात येते त्या ठिकाणी आता रेवणसिद्ध देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर विट्यातील रेवननाथ नगर (सोनार गल्ली, जुना गाव ) विटा या ठिकाणी आहे.

विटा रेवननाथ नगर (सोनार गल्ली) या ठिकाणी रेवणसिद्धाचे जुने मंदिर होते. इराप्पा साखरे यांचे वंशज संदीप साखरे व कुटुंबीयांनी या ठिकाणी श्री रेवन सिद्धांचे भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गेल्या सहा वर्षापासून या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरू होते. नुकताच 22 फेब्रुवारी 2024 रोजी श्री धारेश्वर महाराज, श्री कोळेकर महाराज,  आनंदा रेवजी जंगम (भाकणूक आया) यांच्या हस्ते श्री रेवणसिद्धांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या कलशारोहणाचा सोहळा संपन्न झाला आहे.

आज या नवीन श्री रेवणसिद्ध मंदिरात महाशिवरात्रीचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सकाळी साडेसात वाजता श्री रेवणसिद्धांची महाआरती होईल. तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत.  अशी माहिती संदीप साखरे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *