कडेगाव तालुक्यातील प्रकरणाने खळबळ
सांगली (प्रतिनिधी) : चोरट्यानी घरफोडी करून आपल्या घरातून 15 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची फिर्याद देणारा तरुणच स्वतःच चोरटा निघाल्याचा धक्कादायक प्रकार वांगी ता. कडेगाव येथे उघडकीस आला आहे. याबाबत किरण सिताराम कुंभार, (वय ४२ वर्षे, धंदा शेती, रा. सुतार मळा, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिचंणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत वांगी गावातील सुतार मळा येथे फिर्यादीचे घरी घरफोडी चोरी झाली असुन सदर घरफोडी चोरीत १५ लाख २० हजार रुपये चोरीस गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचा गुन्हा करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
किरण कुंभार यांनी आपल्या घरातून पंधरा लाखांची रोकड चोरीला गेल्याची फिर्यादी होती. मात्र या चोरीचा तपास करत असताना किरण कुंभार हा काहीतरी चुकीची माहिती देत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून किरण कुंभार याच्याच उलट तपासणीला सुरुवात केली. पोलीसी खाक्या दाखवतच कुंभार याने आपण स्वतःच घरातील पैशाच्या चोरीचा बनाव रचल्याचे व खोटी फिर्यादी दिल्याचे मान्य केले.
फिर्यादीच निघाला चोर
: किरण कुंभार याच्या याच्या भाच्याने पंधरा लाख रुपयांची रक्कम विश्वासाने त्याच्या घरी ठेवायला दिली होती. यापैकी सुमारे चार लाखांपेक्षा अधिक रक्कम किरण याने खर्च केली. आता भाच्याने मागितल्यानंतर त्याला 15 लाख रुपये कसे परत द्यायचे ? या विचारात फिर्यादी किरण कुंभार होता. मात्र भाच्याला उरलेली रक्कम देण्यापेक्षा सर्वच रक्कम आपल्या घरातून चोरीला गेल्याचा बनाव किरण कुंभार यांनी केला आणि तशी फिर्याद कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली. परंतु पोलिसांनी किरण कुंभार याची लबाडी उघडकीस आणून त्याच्याकडून सुमारे दहा लाख साठ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे फिर्यादीच निघाला चोर आणि प्रकरण आलं भलतंच समोर अशी चर्चा कडेगाव तालुक्यात सुरू आहे.