सांगली (प्रतिनिधी) : सांगलीत पुराचे पाणी ओसरताच महापालिका प्रशासनाने साचलेला गाळ, कचरा काढण्यास युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. पुराच्या पाण्यामुळे संसर्गजन्य रोग पसरू नयेत म्हणून स्वच्छता आणि औषध फवारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे.
आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून प्रभाग 14 आणि प्रभाग 12 मध्ये 200 कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये गुंतले आहेत.
या दोन दिवसात महापालिकेने अंदाजे 20 टन कचरा संकलित केला आहे. पूर परिस्थिती कमी होत असतातच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले होते.
यानुसार उप आयुक्त वैभव साबळे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्रणील माने, धनंजय कांबळे किशोर काळे यांच्या टीमने पूरपट्ट्यामधील भागात स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार रविवारपासून गाव भागातील विष्णू घाट, अमरधाम स्मशानभूमी, धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. तर आज सोमवारी सकाळपासून कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट , इनामदार प्लॉट , मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे.
या दोन दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण वीस टन कचरा संकलित केला आहे. यासाठी अंदाजे 200 कर्मचारी 10 घंटागाड्या आणि दोन डोजर अशी यंत्रणा पूरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे. ज्या ज्या भागांमध्ये पुराचे पाणी ओसरत जाईल त्या त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा तातडीने केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर यांनी दिली.