: 87 कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश
: मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक
विटा (प्रतिनिधी) : विटा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस आज मंजुरी मिळाली असून रु. 87 कोटी रुपये योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.
विटा शहराच्या पाणी योजने संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज सह्याद्री अतिथी गृहावर विशेष बैठक झाली. या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे, नगर विकास खात्याचे अपर मुख्य सचिव डॉ. के एच गोविंद राज उपस्थित होते.
स्वर्गीय आम. अनिल बाबर यांनी विटा शहरातील सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांची व नगरविकासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. स्वर्गीय आ. बाबर यांनी सभागृहातही याविषयी सातत्याने आवाज उठवला होता.
सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नासाठी सहयाद्री अतिथी गृहावर सायंकाळी 4 वाजता विशेष बैठक पार पडली. या बैठक प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे 87 कोटीच्या विटा शहराच्या सुधारित नळ पाणपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याची माहिती सांगितली.
राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे ८७ कोटी १८ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील वाझर बंधारा येथून असे दोन स्त्रोत असणार आहेत. योजनेत पहिल्या टप्प्यात २०२५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ४. ६९ दलघमी पाणी उपलब्ध करून घेतले जाणार आहे. यातून विटा शहराची दैनंदिन १२. ८६ द.ल.लीटर पाण्याची गरज भागविता येणार आहे.
विटा शहराची २०५५ पर्यंतची १ लाख चार हजार ३३५ ही लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार केला गेला आहे. या योजनेअंतर्गत विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेतील दुरुस्ती पाईपलाईन बदलणे, तसेच वाझर बंधाऱ्यातून नवीन स्त्रोत सुरू करणे, नवीन पाण्याची टाकी, अंतर्गत पाईप लाइन अशी कामे होणार आहेत. या प्रश्र्नी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना मंजूर करून विटे शहराला एक सुखद धक्का तर दिलाच आहेच. शिवाय स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांना एक अनोखी आदरांजली वाहिले आहे
याप्रसंगी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, कृष्णात गायकवाड, अमर शितोळे, संजय भिंगारदेवे, किशोर डोंबे, महेश कदम, भालचंद्र कांबळे, प्रवीण साठे, समीर कदम, सुधीर जाधव, रणजित पाटील, रोहित पाटील, विजय पाटील, महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
विटा पाणी पुरवठा योजना अशी असणार :
1. प्रस्तावित योजनेचा उद्भव वाझर या ठिकाणाहून घेण्यात आलेला आहे. या तलावाला टेंभू उपसा सिंचन चे फीडिंग आहे
2. प्रस्तावित योजनेत 7.5 किलोमीटर ची उर्ध्ववाहिनी वाजर तलावापासून ते आळसंद जलशुध्दीकरण प्रकल्प पर्यंत प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वातील योजनेमधील 28 किलोमीटर लांबीच्या उर्ध्व वाहिनी पैकी ९.५५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन बदलण्याचे प्रस्तावित केले आहे
3. दहा दशलक्ष घनमीटर चा नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे.
4. प्रस्तावित योजनेत विविध व्यासाच्या 76 किमीच्या वितरण वाहिन्या प्रस्तावित केले आहेत
5. प्रस्तावित योजनेत 4.75 लक्ष लिटर क्षमतेचे मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित आहे. तसेच विविध क्षमतेच्या चार उंच साठवण टाक्या प्रस्तावित केलेले आहेत.
6. आळसंद जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प तसेच स्काडा आणि ऑटोमेशन प्रस्तावित केलेले आहे
७. प्रस्तावित योजनेमध्ये शुद्ध पाण्याची १५.५ किमीच्या उर्ध्व वाहिनी प्रस्तावित केलेली आहे
८. त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याची १२.८ किमीच्या गुरुत्ववाहिनी प्रस्तावित केलेली आहे