मिरज (विनायक क्षीरसागर) : मिरज विधानसभा मतदार संघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून (उद्धव ठाकरे गट ) निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने संधी दिल्यास भाजपचे आ. सुरेश खाडे यांच्या विरोधात शड्डू ठोकण्यास सज्ज असल्याचे तानाजी सातपुते यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केले.
या पत्रकार बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, संजय काटे, विशालसिंग राजपूत, महादेव हुलवान, चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, महिला शहर संघटक शाकीरा जमादार आदीसह पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शहरी व ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना तानाजी सातपुते म्हणाले, मी एक तळागाळातील चळवळीचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. गेली ३० वर्षे चळवळीचे काम करत आलो आहे. शिवसेना पक्षात मी गेली ११ वर्षे प्रामाणिक काम करत आहे. २०१४ ला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली. मिरज विधानसभा मतदार संघ अवघ्या १४ दिवसांत पिंजून काढला. चांगली वातावरण निर्मीती झाली. मोठे मताधिक्यही मिळाले. आजअखेर मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. गेल्या १० वर्षात आपण मिरज मतदारसंघात पक्षवाढीसाठी काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी योग्य अशी पायाभरणी झाली आहे.
मतदार व कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार, आदरातिथ्य मानून आपण यावेळची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असा दावा तानाजी सातपुते यांनी यावेळी केला.