आष्टा (डॉ. तानाजी टकले ) : कागल – सातारा रस्त्याची दुरावस्था झाली असून, प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गांवरी टोल नाके बंद करावे, तसेच सेवा रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) महाराष्ट्र प्रदेश अभियंता सेलच्या वतीने देण्यात आला.
मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हा अध्यक्ष संजय रानमाळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कपिल कदम यांनी भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, इस्लामपूर उपविभागीय अधिकारी आणि कासेगाव पोलीस ठाणे यांना दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, सध्या पावसाळा सुरू असून कागल–सातारा महामार्गाचे रूंदीकरणांचे काम चालू आहे. परंतु तांदुळवाडी ते कराड या दरम्यान उड्डाण पुलाची कामे चालू आहेत. त्या ठिकाणी वाहन धारकांना व स्थानिक नागरिकांना सेवा रस्त्याचा उपयोग करावा लागत आहे. ज्याठिकाणी सेवा रस्त्याचा अवलंब करावा लागतो त्या ठिकाणी ५ मीटर सुद्धा रस्ता चांगल्या स्वरूपाचा नाही. संपूर्ण रस्ते खड्डेमय झालेत. वाहन धारकांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, अशा बाब निदर्शनास येत आहे. संबंधित ठेकेदारांना कल्पना देऊन सुद्धा कोणत्याही स्वरूपाचे दुरूस्ती करण्याचे प्रयत्न होत नाही. जर सेवा रस्त्याचा अवलंब करावा लागत असेल तर किणी व तासवडे टोलनाके जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद ठेवावेत. संबंधित ठेकेदारांकडून अथवा कार्यालयामार्फत सेवा रस्ते दुरूस्त करून द्यावेत. अन्यथा शनिवार दि. तीन ऑगस्ट रोजी स. ११.३० वाजता मौजे केदारवाडी ता. वाळवा या ठिकाणी आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे.