भारती विद्यापीठाच्या कडेगाव कन्या महाविद्यालयात सहशिक्षणास मान्यता; पहा सविस्तर

कडेगाव ( प्रतिनिधी ) :  भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव  कदम कन्या महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाकडून तसेच महाराष्ट्र शासनाकडून  मुला- मुलींचे सहशिक्षण सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे.

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी या महाविद्यालयाची सुरुवात 1990 रोजी केली होती. गेल्या 34 वर्षांमध्ये महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये उपक्रमशील महाविद्यालय, कला क्रीडा क्षेत्रात विद्यापीठ, राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश, एन एस एस चा राष्ट्रीय पुरस्कार, महाविद्यालयाचा सर्व सोयींनी युक्त  परिसर, विद्यापीठ परीक्षा मध्ये उत्तम यश आणि  नॅक बेंगलोर यांचेकडून सलग तीन वेळा ‘अ’ मानांकन प्राप्त असे ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाचे उत्कृष्ट महाविद्यालय  आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर काही विद्यार्थिनी परदेशामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. उपक्रमशील आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला नाव लौकिक मिळवला आहे.

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून हे महाविद्यालय फक्त मुलींच्यासाठी सुरू होते. परंतु परिसरातील अनेक पालकांनी वारंवार विनंती केल्यामुळे भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेऊन पालकांच्या  आग्रहामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन स्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे या महाविद्यालयास मुला-मुलींचे  सहशिक्षणाची मान्यता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार देण्यात आली आहे.

महाविद्यालय विकास समिती आणि भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे. कडेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना कराड किंवा विटा या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जावे लागत होते. सहशिक्षणाची मान्यता मिळाल्यामुळे  विद्यार्थी व पालकांचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे चे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम,   भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप आणि भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव यांनी  महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयास सहशिक्षणाची मान्यता मिळाली असून परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी बीए भाग एक,  बीकॉम भाग एक आणि बीएससी भाग एक या तिन्ही विभागाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *