विटा (प्रतिनिधी ) : टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ५ वरून भुड देविखिंडी वितरिकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवण, चिंचाळे, औटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबतची निविदा निघाली असून स्वर्गीय आ. अनिलभाऊ यांच्या पाठपुराव्याला यश आल्याच्या भावना युवा नेते सुहास बाबर यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या भुड देविखिंडी वितरिकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवण, चिंचाळे, औटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभूचे पाणी मिळावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर प्रयत्नशील होते. टेंभू योजनेचा घाणंद – हिवतड कालवा घरनिकी वलवण, चिंचाळे, औटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावांच्या खालून जात होता. त्यामुळे या गावातील कालव्याच्या वरील (डोंगरा जवळील ) गावे टेंभूच्या पाण्यापासुन वंचित रहात होती. या गावाच्या वंचित क्षेत्राला वरच्या भागाला पाणी देताना वनविभागाच्या जमिनीचा मुख्य अडसर होता. याबाबत स्व. अनिलभाऊ बाबर यांनी जलसंपदा विभागास वारंवार पाठपुरावा करुन या कामाची परवानगी घेतली होती.
दरम्यानच्या काळात भाऊंचे निधन झाले. या कामाची दि. 24/ 02/ 2024 रोजी निविदा प्रसिध्द झाली. या कामाची वनविभागाची दि. 14/ 02/ 2024 रोजी परवानगी मिळाली. परंतु वनविभागाची जलसंपदा विभागास प्रत्यक्षात मार्च महिन्यात परवानगी मिळाली. या कामाची फेब्रुवारीमध्ये निविदा निघाल्यानंतर निविदा भरण्यासाठी ठेकेदारांनी अनास्था दाखविली होती.
आम. अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर युवकनेते सुहास बाबर यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर या कामांची निविदा निघाली असून टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ५ वरून भुड देविखिंडी वितरिकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवण, चिंचाळे, औटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभूचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.