आष्टा (डॉ तानाजी टकले ) : राज्यात लोकसभा निवडणुकापूर्वी उठलेले पक्ष, नेते फोडाफोडीचे राजकारण आता कुठंसं शांत वाटत असतानाच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघातील ढवळी येथील राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकारी ब्रिगेडने भाजपात प्रवेश करीत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. तंटामुक्ती अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी मा अध्यक्ष,यांच्यासह समर्थकांनी भाजपात प्रवेश केला. राज्यात आघाडीवर असणारी राष्ट्रवादी अन राष्ट्रवादी चे प्रदेध्यक्ष जयंत पाटील यांच्या होम पिचवर भाजपने पुरोगामी ढवळीत राष्ट्रवादीला खिंडार पाडले आहे.
ढवळी वारणा नदीकाठावरील शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप ) माजी मंत्री स्व एन डी पाटील यांचे गांव, तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा इस्लामपूर विधानसभा मतदार संघ. पुरोगामी विचाराने समृद्ध वारसा असणारे संवेदनशील राजकीय गांव. राज्यात चाणक्यनीतीने आ. जयंत पाटील यांनी अनेकांना राष्ट्रवादीत घेत खासदार केले. त्याच जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदार संघात भाजपने राष्ट्रवादीला शह देत ढवळी येथील राष्ट्रवादीची झालर असणारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील, युवक राष्ट्रवादी माजी उपाध्यक्ष अभिजीत नलवडे, ढवळी स्पोर्ट्स ढवळीचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, हेमंत पाटील, शशिकांत पाटील, दीपक पाटील, विराज पाटील, लालासो पाटील, अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष उत्तम वायदंडे, नितीन कांबळे, संभाजी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यामुळे वारणा पट्ट्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडण्यात, आपल्याकडे वळवण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे. येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी प्रत्यूश पाटील, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रसाद पाटील, भाजपाचे वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीणभाऊ माने, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचा पक्षामध्ये सन्मान राखला जाईल. सचिन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बळ देणार आहोत. सचिन पाटील म्हणाले, निशिकांत भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भारतीय जनता पार्टीचा नेटाने प्रचार आणि प्रसार करणार आहोत.