सांगली ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सांगली जिल्हा शैक्षणिक व्यास पिठाच्या विराट मोर्चात आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक यांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर विराट मोर्चा काढण्यात आला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था चालक यांच्या विविध मागण्या संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळा महाविद्यालये चालवणे मुश्किल झाले आहे. शासनाने या सर्व घटकांचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रासाठी तुटपुंजी आर्थिक तरतूद ही महाराष्ट्राच्या प्रगतीला खो घालते, १५ मार्च २०२४ चा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे, पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे ती रद्द केली पाहिजे, सर्व शाळा महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत असे सांगितले. विविध संघटना प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली. क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करुन विराट मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात जिल्ह्यातील २८ संघटना सहभागी झाल्या होत्या. एकच मिशन – जुनी पेन्शन, १५ मार्चचा काळा कायदा रद्द करा, शाळा तेथे मुख्याध्यापक पद दिले पाहिजे , शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे इ. विविध १६ मागण्यावरील घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या मोर्चात रावसाहेब पाटील, आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, आटपाडीचे रावसाहेब पाटील, संजय दुधाळ, भगवानराव साळुंखे,जे. एस. पाटील आप्पा, प्रा. एन. डी. बिरनाळे, संजयकुमार झांबरे , राजेंद्र नागरगोजे , अमोल शिंदे, अमोल माने, विजय कांबळे, बाळासाहेब कटारे, अरविंद गावडे, प्रशांत चव्हाण, फैसल पटेल, एस. वाय. जाधव, अरविंद जैनापुरे, सुधाकर माने, जे. एस. पाटील, संजय कदम, शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.