सुहास भैय्यांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा; मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार


विटा (प्रतिनिधी) : विटा आणि आटपाडी तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच दोन्ही तालुक्यात आदर्शवत आणि सर्व सुविधायुक्त वारकरी भवन उभारण्यात येतील, अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.

विटा : कै. सौ. शोभाकाकी बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त अमोल बाबर, सुहास बाबर यांच्या हस्ते तालुक्यातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

कै. सौ. शोभाकाकी बाबर यांच्या द्वितीय‌ पुण्यस्मरणानिमीत्त बाबर कुटुंबियांच्यावतीने अमोल बाबर यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व भजनी मंडळाना पकवाज, मृदुंग, सुरपेटी व टाळ या साहित्याचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी सुहास बाबर बोलत होते.

सुहास बाबर म्हणाले, माझी आई धार्मिक वृत्तीची होती. पांडुरंगाचे आणि तिचे अतुट नाते होते. आज आम्ही तिच्या स्मरणार्थ भजनी मंडळाना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे. या माध्यमातून आमच्या आईच्या स्मृती चिरंतन रहाव्यात. तिला देवाची आस होती ती जिथे कुठे असेल तिथे तिची आणि देवाची भेट व्हावी अशी आमची प्रार्थना आहे असे भावनिक उदगार काढत खानापुर आणि आटपाडी तालुक्यात एक एक वारकरी भवन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना युवक नेते सुहास बाबर यांनी व्यक्त केली.

कै. सौ. शोभाकाकी बाबर यांच्या  प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मागिल वर्षी आंब्याच्या वृक्षांचे वाटप केले होते.  आजच्या या कार्यक्रमाला स्वर्गिय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे संपर्क कार्यालय असलेल्या शिवसेना भवनला श्रावणी सोमवारी अत्यंत धार्मिक स्वरूप आले होते. गावोगावहून भजनी मंडळी या ठिकाणी येवुन भजन सादर करत पांडुरंगाचा गजर करत होती. यावेळी उपस्थित वारकरी संप्रदायाकडून व मान्यवरांकडून स्वर्गिय शोभाकाकी बाबर व स्वर्गिय आमदार अनिलभाऊ बाबर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली

माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांनी बाबर कुटुंबाचे  या उपक्रमाबद्दल आभार मानून भजनी मंडळाचे स्वागत केले. खानापुर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह. भ. प. नामदेव महाराज शिंदे यांनी  कै. सौ. शोभाकाकी यांची वारकरी संप्रदायाप्रती प्रचंड आस्था असल्याचे सांगत काही घटना सांगितल्या व त्यांचे आकस्मिक जाणे वेदनादायी असल्याचे सांगितले. अमोल व सुहास या बाबर बंधूंनी आई च्या स्मरणार्थ राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी सांगली जिल्हयातील सर्वोत्कृष्ट पक्वाज वादक म्हणुन निवड झालेल्या प्रसाद बापु कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
————-
अनिलभाऊ यांच्यावर अभंग…!

      या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावोगावहून भजनी मंडळी आली होती. परंतु नागनाथ भजनी मंडळाने लक्ष वेधुन घेतले. या भजनी मंडळातील मधुबाई खरात या माऊलीने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने  ‘अनिलभाऊ आमचा नेता खरा, पाणी फिरवले रानोमाळा….असे स्वर्गीय आमदार अनिलभाऊंच्यावर एक भजन सादर केले. त्यावेळी एक भावनिक वातावरण तयार झाले.. अन् अनेकांच्या ऊरी हुंदका दाटून आला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *