विटा ( प्रतिनिधी ) : विटा शहरात आल्यापासून सुहास भैया बाबर यांच्या कामाची माहिती घेतोय. त्यांनी अल्पावधीतच केलेले काम पाहून मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी जरी रील स्टार असलो तरी वास्तविक जीवनात मात्र सुहास भैय्या बाबर हेच रियल स्टार आहेत, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे यांनी काढले.
विटा येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मदारसंघाचा” स्वाभिमान भव्य रिल्स स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुप्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे यांच्या शुभहस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रथम क्रमांक- स्वप्निल सावंत, द्वितीय क्रमांक- संदीप दबडे, तृतीय क्रमांक- निलेश बारसिंग, चतुर्थ क्रमांक- असलम शेख आणि पाचवा क्रमांक- रचना धुमाळ तसेच मोस्ट व्ह्यूज व मोस्ट लाईक- प्रथमेश गोडसे यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी टेंभू योजनेविषयी केलेले कार्य आणि या माध्यमातून मतदार संघात झालेली हरितक्रांती या विषयावरती तरुणांनी सादर केलेल्या रिल्समुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. स्वर्गीय अनिलभाऊंचे आभाळा एवढे कार्य अवघ्या एक दीड मिनिटाच्या रील मध्ये सामावण्याचे कौशल्य अचूकपणे साधणारे रिल्स सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरले.
युवा नेते सुहास बाबर यांनी सुरुवातीला अथर्व सुदामे यांची ओळख करून देत त्यांच्या गाजलेल्या रील्सचे अनेक किस्से सांगितले. सुदामे यांच्या रिल्समध्ये विनोदी शैलीबरोबरच समाज प्रबोधनाचा धागा असतो. त्यामुळेच ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांबरोबर सुदामे यांनी रील्स बनवलेल्या आहेत. आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना रिल्स आणि समाज माध्यमांची ओळख व्हावी म्हणून सुदामे यांना निमंत्रित केल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले.
सुदाम यांचे चौकार षटकार :
सुदामे यांनी तरुण-तरुणींशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या प्रश्नावर मार्मिक असे चौकार आणि षटकार लगावले. त्यांचा सुप्रसिद्ध असा ” हे काही बरोबर नाही ” हा डायलॉग देखील म्हणताना , ” मला कार्यक्रमाला बोलवून अभिनय करायला सांगताय, विटेकरांनो हे काय बरोबर नाही.” असे सांगत आपल्या हजरजबाबीपणा चा परिचय दिला.
यावेळी रील स्टार, रियल स्टार अशी चर्चा सुरू असतानाच राहुल साळुंखे यांनी माईक हातात घेत स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेचे पाणी आणून खानापूर मतदारसंघ दुष्काळमुक्त कसं केला ; याची माहिती सांगितली. यावेळी त्यांच्यासह उपस्थिततांचा कंठ दाटून आल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमास उत्तम बापू चोथे, राजाभाऊ शिंदे, माजी नगरसेवक अमर शितोळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत अण्णा बाबर, माजी सभापती मारुती शिंदे, प्रकाश बागल, भरत अण्णा लेंगरे, दिलीप किर्दत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.