अनिलभाऊंच्या आठवणीने डोळे पाणावले; प्रतीक्षा संपली, मागणी पूर्ण


विटा (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटी  बुद्रुक येथील साठवण तलावासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ युवा नेते सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र यावेळी प्रतीक्षा संपली मागणी पूर्ण झाली, परंतु भाऊ आज आपल्यात नाहीत, असे सांगताना ग्रामस्थांचा कंठ दाटून आला.

घोटी बुद्रुक साठवण तलावाच्या  कामाचा शुभारंभ करताना युवा नेते सुहास बाबर. यावेळी सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच सुरेश जाधव, सरपंच परिषदेचे अध्यक्ष उद्धवबापू जाधव,  गणपतराव जाधव व अन्य.

घोटी बुद्रुक येथे साठवण तलाव बांधण्यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या तलावासाठी अनेक प्रकारची विघ्ने येत होती.  कधी हा तलाव तांत्रिक बाबीत अडकायचा तर कधी वनखात्याची परवानगी नसायची. एक पिढी संपली, दुसरी पिढी निम्मी पुढे गेली, आता नवी पिढी आली आहे. पण या तलावासाठी स्वर्गिय भाऊंनी  तळमळ सोडली नाही. अखेर हा तलाव मंजूर करूनच आणला, त्यांचे हे ऐतिहासिक काम आहे. ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील. आज या साठवण तलावाचे भूमिपूजन करताना अक्षरश: स्वर्गीय भाऊंच्या आठवणीने डोळे भरून येत आहेत, अशा भावना घोटी बुद्रुक च्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, आयुष्याच्या अखेरपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचे उदाहरण स्वर्गीय अनिलभाऊंनी दाखवून दिले. घोटी बुद्रुकच्या डोंगरदऱ्यात या साठवण तलावाचे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती देईल व तो परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, अशी मला खात्री आहे. काही कामे आयुष्यभर स्मरणात राहणारी असतात, घोटी बुद्रुक चा साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उदगार युवक नेते सुहास बाबर यांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच सुरेश जाधव यांनी तर प्रास्ताविक सरपंच सुवर्णा जाधव यांनी केले. यावेळी खानापूर तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उद्धवबापू जाधव,  गणपतराव दादा जाधव , भास्कर जाधव पोपट जाधव, शरद जाधव, नामदेव जाधव, दिलीप जाधव, राजेंद्र पाटील,भारत कांबळे, विश्वास कांबळे, रफिक मुलानी, बापूराव चव्हाण, नवनाथ पवार, आदींसह जलसंधारण  व वन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार बालाजी जाधव यावेळी उपस्थित

असा असेल साठवण तलाव :

हा तलाव पूर्ण झाल्यानंतर यामध्ये २३  दशलक्ष घन फुट पाणीसाठा होणार आहे. विशेष म्हणजे टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या साठवण तलावात सोडण्यात येणार आहे. तलावाला तब्बल सत्तर फूट उंचीचा बांध बांधण्यात येणार आहे. या तलावामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या घोटी बुद्रुकला तर फायदा होणारच आहे. शिवाय  पारे गावासाठी देखील हा तलाव किफायतशीर ठरणार आहे. दोन डोंगरदर्‍याच्या मधोमध या पाणी साठवण तलावाची साईट असल्याने भविष्यात हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास वाव आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *