कडेगाव / प्रतिनिधी : शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा आधार घेत कडेगांव तालुक्यात शिलाई मशिनच्या नावाखाली महिलांची आर्थिक लुट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हस्त कला व कारागिर तसेच बारा बलुतेदारांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी शिलाई मशिन , इतर साहित्य तसेच , ट्रेनिंग सुरु असणाऱ्या कार्यकाळात प्रत्येक दिवसासाठी आर्थिक मदत, याचबरोबर व्यवसाय उद्योगधंद्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाईल या प्रकारचे आमिष दाखवून सरसकट महिलांचे अर्ज भरून घेतले जातात व सदर महिलाकडून ५०० रुपये प्रमाणे रक्कम उकळण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे गावा-गावात एजंट तयार करून काहीजनांनी हा धदांच सुरू केला आहे.
देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा ही योजना अंमलात आणली आहे. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त कलाकार आणि कारागिरांची गुरू- शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटूंबाची पारंपारीक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच हस्त कलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मुल्यसाखळीशी जोडले जातील यासाठी या योजनेतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय या योजनेतून सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करयासाठी या योजनेतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. याशिवाय या योजनेतून सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.
विशेष करून बचत गटाच्या महिलांना एकत्र करून महिलांसाठी शिलाई मशीनयोजना आली आहे अशी खोटी माहिती देऊन त्यांच्या कागदपत्रासह अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली जात आहे. शासनाकडून या योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी कोणतीही फी आकारू नये, असे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा घोटाळेबाज व्यक्तींकडून ५oo रुपये रक्कम घेण्यात येत आहे. अशा फसव्या योजनांना ग्रामीण भागातील महिला बळी पडताना दिसत आहेत. तरी बरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे