विटा ( प्रतिनिधी ) : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर रोजी रेवानगर विटा येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.
खानापूर मतदार संघातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाची तसेच शेतकरी मेळाव्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, अमोल बाबर, कृष्णत गायकवाड उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता तसेच कामाची निविदा निघाली आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन ऑक्टोबर रोजी रेवानगर विटा येथे कामाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता महात्मा गांधी विद्यामंदिर विटा येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
बाबर म्हणाले, टेंभू योजना हे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांचे स्वप्न होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी योजनेच्या पूर्ततेसाठी खर्ची घातले. सहाव्या टप्प्याच्या माध्यमातून टेंभू योजनेचे काम पूर्णत्वास येत आहे. मात्र दुर्दैवाने आज अनिलभाऊ आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात सर्व सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी मोठे परिश्रम घेतले आहे.
सहाव्या टप्प्याच्या माध्यमातून टेंभू योजनेच्या पूर्ततेचे आमदार अनिल भाऊ चे स्वप्न पूर्ण होत असून मतदार संघातील एक ही गाव पाण्यापासून आता वंचित राहणार नाही. टेंभू योजनेची ही पूर्तताच आमदार अनिल भाऊंना खरी श्रद्धांजली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या भूमिपूजन कार्यक्रमास तसेच शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सुहास बाबर, अमोल बाबर आणि तानाजी पाटील यांनी केले. यावेळी उत्तमराव चोथे, संभाजी जाधव, अनिल म. बाबर, भरत अण्णा लेंगरे, फिरोज शेख यांच्यासह खानापूर मतदार संघातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
नारळ फुटणार विधानसभेचा..
विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता जाहीर होणार आहे. खानापूर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुहास बाबर यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी विधानसभेचा देखील नारळ फुटणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.