विटा ( प्रतिनिधी ) : लेंगरे व परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी, लोकांच्या अडचणीत तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी निसर्ग फाउंडेशन ची रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरेल असा विश्वास सांगली जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केला.
लेंगरे येथील रुग्णवाहिका प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की निसर्ग फाउंडेशन संस्थेची रुग्णवाहिका असावी ज्या माध्यमातून या भागातील अडचणीच्या काळात लोकांना मदत होईल. असा संकल्प डॉ. विक्रमसिह कदम यांनी केला आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी अनिलभाऊंची भेट घेऊन संस्थेला रुग्णवाहिका द्यावी याबाबत चर्चा केली होते. त्यावेळी भाऊंनी 100% रुग्णवाहिका देऊ व मदत करू असा शब्द दिला होता. भाऊंनी दिलेला शब्द पूर्ण करणे हे माझे कर्तव्य ठरवून मी भाऊंचा शब्द पूर्ण केला यांचे प्रचंड समाधान या प्रसंगी आहे, असे भावनिक मनोगत व्यक्त केले.
लेंगरे येथे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ निसर्ग फाउंडेशन संस्थेस रुग्णवाहिका प्रदान सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी विद्यार्थी व परिसरातील यशस्वी उद्योजकांना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. संजय ठिगळे म्हणाले की लेंगरे व परिसरात रुग्णवाहिकाची नित्तांत आवश्यकता होती. लोकांच्या अडचणीत संस्थेची रुग्णवाहिका फार महत्वाची ठरणार आहे. स्वर्गीय अनिलभाऊंनी संस्थेला दिला शब्द आज त्यांचे कुटुंब पूर्ण करत आहे. या गोष्टीचा अभिमान आहे. आमच्या गावासाठी केलेले हे दातृत्व संस्मरणीय आहे.
सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम आपल्या मनोगतात म्हणाले की निसर्ग फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात फार चांगले काम करत आहे. आम्ही सगळी मंडळी संस्थेच्या कामात नेहमीच सक्रिय योगदान देण्याचा प्रयत्न करतो. कोव्हिड कालखंडात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णवाहिका कधी कधी उपलब्ध न झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे पहिले आहे. आज लेंगरे भूड मादळमुठी वाळूज देविखिंडी अश्या भागातील लोकांना या रुग्णवाहिकाचा उपयोग होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे एखाद्याचे प्राण वाचले तरी या उपक्रम यशस्वी झाला असे मला वाटते. अनिलभाऊंच्या स्मरणार्थ आजपासून लेंगरे गावात ही रुग्णवाहिका चालू होत आहे. गरजूना मदत करण्याची प्रामाणिक भूमिका घेऊन संस्था काम करत आहे आपण संस्थेच्या पाठीशी उभा राहून या उपक्रमात योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन डॉ कदम यांनी केले.
यावेळी माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख म्हणाले की स्वर्गीय भाऊंचा शब्द आज सुहास भैय्यांनी पूर्ण केला आहे. गावाची, लोकांची असलेली गरज लक्षात घेता मदतीला धावून जाणे हे बाबर कुटुंबाचे संस्कार आहेत. लेंगरे हे या भागातील मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे गोर गरीब निराधार पासून सर्वांनाच ही रुग्णवाहिका मोलाची ठरणार आहे भाऊंच्या स्मरणार्थ लेंगरे गावात पहिलीच रुग्णवाहिका सुरु होत आहे आपल्या सर्वांच्या भाग्याचा दिवस आहे असे मनोगत व्यक्त केले
या सोहळ्यानंतर शानदार राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मोठा गटातील विविध प्रकारातील नृत्यांचा आनंद यावेळी उपस्थितांनी घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातील स्पर्धेकांनी सहभाग घेतला. तब्बल लाखों रुपयांच्या पारितोषिकचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमास युवानेते सुहास बाबर, माजी जि. प. सदस्य फिरोज शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, प्रा. संजय ठिगळे, मा. उपसभापती किसन सावंत, सहकार बोर्ड संचालक भास्कर पवार, बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर,जेष्ठ नेते सुनिल पाटील, उपसरपंच जाकीर पठाण, राजेंद्र मोहिते, मा. चेअरमन सुरेश चिंचणकर, मा. सभापती मनिषा बागल, सोनियावाहिनी बाबर, मा.जिप सदस्या निलम सकटे, सईफ देसाई, मज्जीद पटेल, हभप लोहार सर, एजाज देसाई, याकूब शिकलगार सोमनाथ मंडलिक संस्थेचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, उपाध्यक्षा डॉ. वैशाली हजारे, सचिव नानासाहेब मंडलिक, भगवान जाधव डॉ. शिवाजी गुजर, नवनाथ सगरे, प्रमोद भोसले, सुरज मंडले, रेखा सगरे, अभि गायगवळे, प्रतिक्षा जाधव, सुरज भारते, सौरभ मंडलिक आदी उपस्थित होते.