मुंबई (प्रतिनिधी) : आज 10 जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सातारा जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या परिसरातही आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस :
आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.