: शिवसेनेच्या ठाकरे – शिंदे गटातच लढत
सांगली (राजेंद्र काळे ) : खानापूर मतदारसंघात महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी मुख्य प्रतिस्पर्धी असलेले वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून नव्हे तर शिवसेनेच्याच उद्धव ठाकरे गटातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या मैदानात शडडू ठोकतील, अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
खानापूर मतदारसंघात सध्या विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
मतदार संघातील स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर गट, माजी आमदार सदाशिवराव पाटील गट, भाजपचे आ. गोपीचंद पडळकर गट आणि भाजपचे माजी आ. राजेंद्रआण्णा देशमुख गट हे चारही प्रमुख गट सध्या महायुतीतील भाजप, शिंदे गट किंवा अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे सध्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकही खंबीर नेता नाही. लोकसभा निवडणुकीत हे चारही प्रमुख नेते एकत्र असताना भाजप उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीचे विशाल पाटील यांनी मोठे लीड घेतल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभेला नवीन राजकीय गणित
: खानापूर मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सुहास बाबर हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातून विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मतदार संघात शेकडो कोटींचा निधी देत विकास कामाच्या माध्यमातून सुहास बाबर यांना मोठे पाठबळ दिले. स्वर्गीय अनिलभाऊ यांच्यानंतर महायुतीकडून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. अजितदादा पवार गटाकडे वैभव पाटील यांच्या उमेदवारीची मागणी असली तरी मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याने वैभव पाटील यांच्या उमेदवारीची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सध्या वैभव पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद हे खानापुरातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत असले तरी पक्षाचे विरोधात ते कोणती भूमिका घेतील, अशी शक्यता दिसून येत नाही.
खानापुरात ठाकरे यांच्या
शिवसेनेचा दावा ?
खानापूर मतदारसंघात आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर हे गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटातून निवडून आले आहेत. त्यानंतर गेले काही महिन्यापूर्वी आमदार बाबर यांनी बंड करत राज्यातील आमदारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. या ठिकाणी दोन वेळा ठाकरे गटाचा आमदार झालेला असल्याने महाविकास आघाडीतून खानापूर मतदारसंघावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच प्रबळ दावा आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, तासगाव या मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर कडेगाव, सांगली, जत या ठिकाणची उमेदवारी काँग्रेसला मिळण्याचे जवळपास निश्चित आहे. अशावेळी महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेला शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट खानापूर आणि मिरज या मतदारसंघातून आपले उमेदवार मैदानात उतरवणार हे निश्चित आहे.
खानापूर मतदारसंघ
कोणाला सुटणार ?
महाविकास आघाडीतून खानापूर मतदार संघावर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दावा असला तरी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. अशावेळी खानापूर मतदार संघ महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
वैभव पाटील हे ठाकरे
गटातूनच लढणार !
खानापूर मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून तर महाविकास आघाडीची जागा ठाकरे गटालाच सुटण्याची शक्यता आहे. वैभव पाटील हे जरी सध्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असले तरी महायुतीची उमेदवारी सुहास बाबर यांना मिळाल्यास वैभव पाटील हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरतील हे निश्चित मानले जात आहे. वैभव पाटील हे महाविकास आघाडीतून लढल्यास त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांचे पाठबळ लाभण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बाबर गटाच्या अंतर्गत विरोधातील भाजप नेत्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी देखील वैभव पाटील यांनी फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकताच माजी आमदार सदाशिव पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी आपण विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे वैभव पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. वैभव दादा विधानसभा लढणार मात्र पक्ष कोणता हे प्रश्नचिन्ह कायम आहे ?
एकंदरीतच, सध्या खानापूर मतदार संघात एकनाथ शिंदे गटाकडून महायुतीतून सुहास बाबर यांची उमेदवारी तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून वैभव पाटील यांची उमेदवारी होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे