: आयर्विन पाणी पातळी 28 फुटावर
: नागरिकांचे स्थलांतर सुरू
सांगली ( प्रतिनिधी ) : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सांगली शहराला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. महापुराच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले.
आयुक्त गुप्ता म्हणाले, कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. आयर्विन पूला जवळ 28 फुट इतकी पाणी पातळी आहे. या ठिकाणची पाणी पातळी तीस फुटावर गेल्यानंतर सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट या भागात पाणी शिरण्यास सुरुवात होते.
त्यामुळे संभाव्य परिस्थिती ओळखून या भागातील नागरिकांचे शाळा नंबर 3 व शाळा नंबर 17 (हिंदू मुस्लिम चौक) या ठिकाणी निवारा केंद्र मध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केट शेजारील मैदान तसेच सम्राट व्यायाम मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशासनाच्यावतीने पूर बाधित नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याची पातळी वाढत जाईल त्या नुसार त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. तश्या सूचना देखील देण्यात येणार आहेत. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन, एनडीआरएफ ची टीम सज्ज आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन शुभम गुप्ता यांनी केले आहे.