: सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉटमधील रहिवाशांचे स्थलांतर
: मदत कार्यासाठी प्रशासन सज्ज
सांगली (प्रतिनिधी) : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीचे पाणी वाढून सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉटमधील घरामध्ये घुसले आहे. या परिसरातील 16 कुटुंबातील सुमारे 56 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिले आहे.
कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सांगली शहरावर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंगावत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी 31 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉट या भागातील नागरिकांच्या घराला पाण्याचा वेढा पडला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसरातील 16 कुटुंबांचे निवारा केंद्रात स्थलांतर केले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने कर्नाळ रोड, शिव मंदिर परिसर, काका नगर आणि दत्तनगर या परिसरातील नागरिकांना देखील स्थलांतरासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी आठ वाजता पाणी पातळी 31 फुटावर असून या ठिकाणी चाळीस फुटावर इशारा पातळी तर 45 फुटावर धोका पातळी आहे. त्याचप्रमाणे मिरज कृष्णा घाट पुलाजवळ इशारा पातळी 45 फुटावर असून सध्या पातळी 44 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे देखील स्थलांतर सुरू झाले आहे.
दरम्यान सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी संभाव्य पुरस्थिती असलेल्या भागात जाऊन नागरिकांची भेट घेतली आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी सूचना केल्या. नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनाप्रमाणे योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.