सांगली (प्रतिनिधी) : देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे हा प्रस्ताव शेतीचे स्वरूप बदलणारा, तसेच शेती आणि मानवी आरोग्य यांची सांगड घालणारा आहे. कृषी क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वागत आहे असे मत पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले.
पवार म्हणाले, कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याचा नक्कीच लाभ होईल. भाजीपाला क्लस्टरचा उपयोग सांगली जिल्ह्याला देखील होऊ शकतो, असा मला विश्वास वाटतो. तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी विशेष प्राधान्य या अर्थसंकल्पात देण्यात आलेले आहे. स्ट्रीट फूड क्लस्टर हा विषय फेरीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातून त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळू शकते. कौशल्य विकासासाठी निधीची तरतूद हा अत्यंत स्वागतार्य निर्णय आहे. कुशल कामगार हा या देशाचे बलस्थान बनेल, असा विश्वास आजच्या अर्थसंकल्पातून मिळालेला आहे. महिलांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. एकूणच देशातील सर्व घटकांना मजबूती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केले.