सांगली, ( प्रतिनिधी ) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. शासन, प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली व कृष्णाघाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते व अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या, यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.