मित्रानेच फसवले मित्राला ; एक कोटी 90 लाखाला घातला गंडा


: विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विटा ( प्रतिनिधी) :  मुंबईतील सराफास देण्यासाठी पाठविलेले १ कोटी ९० लाखांचे सोने परस्पर लंपास केल्याबद्दल संशयित सागर बाबासाहेब गुजले (वय ३२, रा. लेंगरे, ता. खानापूर) याच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश दिनकर जाधव (वय २७, रा. मेंगाणवाडी, ता. खानापूर) याने घटनेची फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  फिर्यादी नीलेश जाधव आणि संशयित सागर गुजले हे दोघे एकमेकांच्या चांगले परिचयाचे आहेत. हे दोघेजण बेळगाव येथील सराफ कैलास गोरड यांच्या दुकानातील चोख सोने घेऊन ते मुंबईतील अक्षय शेटे यांच्या दुकानात द्यायचे तसेच तेथून सोन्याच्या साखळी घेऊन बेळगावला आणण्याचे काम करत होते.

निलेश जाधव याने २० डिसेंबर २०२३ रोजी बेळगाव येथील गोरड यांच्या माउली बुलियन्स या दुकानातून तीन किलोचे सोने घेतले होते. हे सोने मुंबईत अक्षय शेटे यांच्या दुकानात द्यायचे होते. जाधव याने हे सोने दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी लेंगरे (ता. खानापूर) येथे जाऊन सागर गुजले याच्याकडे दिले. त्याला मुंबईत जाऊन हे साेने अक्षय शेटे याच्याकडे देण्यास सांगितले. परंतु सागर याने हे सोने मुंबईत पोहोच केलेच नाही. त्यानंतर जाधव याने वारंवार विचारणा करूनही संशयित सागर याने सदरचे सोने परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे हे ओळखून निलेश जाधव याने विटा पोलिस ठाण्यात सागर गुजले याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.

गलई व्यवसायातून होत असलेल्या या वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे गलई बांधवांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *