सांगली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरुन सुखरूप बाहेर काढण्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर शिवाजी काशीद यांचा सांगलीत पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत नाभिक समाजाचे योगदान मोलाचे आहे. या समाजातील शूर मावळा वीर शिवाजी काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरुन सुखरूप बाहेर काढण्यासाठी बलिदान दिले. हा त्यांच्या त्यागाचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. सांगलीत त्यांचा पुतळा नाही. पुतळ्याच्या रुपात त्यांचे उचित स्मारक व त्यांच्या बलिदानाबद्दल सांगलीची कृतज्ञता व्यक्त होईल. नाभिक महामंडळाने सांगलीत प्राधान्यक्रमानुसार सुचवलेल्या एका जागेवर महापालिकेने पुतळा उभा करावा, अशी आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी आज शिष्टमंडळासमवेत समक्ष भेटून केली आहे.
या कामी आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय मंजूरी व आर्थिक तरतुद करुन पुतळा उभारणीचे काम लवकर सुरु करावे, अशी आग्रही मागणी केल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते. निवेदन देताना नाभिक महामंडळ राज्य संघटक शशिकांत गायकवाड, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल यादव, कार्याध्यक्ष सागर चिखले, उपाध्यक्ष कल्लाप्पाण्णा कोरे, सचिव संतोष कदम, खजिनदार अरविंद कदम, मिडिया प्रमुख राजू क्षीरसागर, मिरज तालुका प्रमुख अनिल खंडागळे, सल्लागार पत्रकार चंद्रकांत गायकवाड, सदस्य राजू जाधव, विजय अस्वले, अजय देशमुख, सनी धोतरे, आयुब निशाणदार, व काँग्रेस पक्षाचे आणि नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.