आष्टा (डॉ तानाजी टकले ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मतदार संपर्क, संवाद मेळावे घेऊन दौरा पूर्ण केला. आगामी विधानसभेसाठी मतदारसंघाची मशागत केली, तर भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी साधलेल्या मशागतीत राष्ट्रवादीतील अनेक गटांचे भाजप प्रवेश करीत साखरपेरणी सुरू केली आहे. महायुतीतील शिवसेनेकडून कोळपणीची आस दिसतेय,भाजपा शिवसेनेतील जागावाटपा नंतरच पीक कोण घेणार हे कळेल. राज्य पातळीवरील नेतृत्वाकडून येथे एकास एक लढतीची चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास येथे महाराष्ट्राचे लक्ष वेदणारी कांटे की टक्कर पाहिला मिळेल.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सप्तपदी साधली आहे. विरोधकातील बेकी -बंडाळीने येथे जयंतरावांचा वरचष्मा कायम राहिला आहे. मागील निवडणुकीतील घडामोडी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपची सोडलेली साथ, स्थापन झालेले काँग्रेस- राष्ट्रवादी शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार. त्यानंतर एकनाथ शिंदेनी भाजपसोबत स्थापन केलेले शिंदे सरकार, लागलीच त्यात अजित पवारांची सामील झालेली राष्ट्रवादी, राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या पक्षफुटीच्या उलथापालत्या झाल्या. यात संयम राखत शिवसेना उद्धव ठाकरेसेना -राष्ट्रवादी शरद पवार पक्ष -काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात करीत राज्यात महाविकास आघाडीची कमांड पक्की केली. यात सरसेनापती ठरले ते जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांनी काढलेल्या पदयात्रा लोकसभेसाठीचे पक्षप्रवेश, उमेदवाऱ्या, विजयी उमेदवार या साऱ्यात जयंतरावांची भूमिका राष्ट्रवादीसाठी महत्वपूर्ण ठरली आणि जयंतरावांचे नेतृत्व सर्वमान्य महाराष्ट्रभर पोहचले.
अनेकांनी ते स्वीकारले. लोकसभेतील यशानंतर अल्पावधीतच होणाऱ्या विधानसभेसाठी जयंतरावानी मतदारसंघाचा दौरा हाती घेतला. त्याला संवाद संपर्क दौरा नाव दिले. मतदारसंघातील खेडीगावे, शहरे संवाद साधला. इस्लामपूर आष्टा या मोठ्या शहरात बुथनिहाय बैठका घेतल्या. राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत व्हावा शहरातील कार्यकर्ते नागरिकांच्या समस्यांची जाणीव व्हावी समस्या सोडवण्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत या उद्देशाने आष्टा शहरात दोन दिवसात 30 बैठकांचे नियोजन झाले. नगरपालिका संबंधित विषय, पानंद रस्ते, पुनर्वसन, रेशन कार्ड, घरकुले समाज मंदिरे, पाणी, वीज अशा अनेक समस्या नागरिकांनी संवाद संपर्कात मांडल्या. जयंत पाटील यांनी काही समस्या जागेवरच निकालात काढल्या तर काही प्रश्न सोडवण्याची ग्वाही देत दिलासा दिला. शरद पवारांवरील निष्ठेचे दाखले देत राज्याच्या पक्ष जबाबदारीमुळे पुन्हा येता येणार नाही आता जयंत पाटील म्हणजे तुम्हीच उमेदवार समजून मते द्या अशी साद घालीत कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करा असा इशारा दिला. समर्थक कार्यकर्ते रिचार्ज झाले. संपर्क संवादाने जयंतरावांनी विधानसभेची मशागत केली अन शिवसंदेश यात्रेची वाट धरली.
संवाद संपर्काची हवा ताजी असतानाच भाजपाचे निशिकांत पाटील गटाने जयंतरावांनी केलेल्या मशागतीत साखरपेरणी साधली. मतदार संघात समाजनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले. राष्ट्रवादीतील तरुणांना भाजपकडे आकर्षित करीत भाजप पक्ष प्रवेशाचा धडाका लावला , ढवळी, बहादूरवाडी आष्टा मिसळवाडी, बाजारवाडी, चांदोली वसाहत येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, तरुणांचे भाजपात प्रवेश घेतले, त्यांना बळ देण्याची ग्वाही निशिकांत पाटील यांनी दिली. निशिकांत पाटील यांच्या ग्वाहीने तरुणांचे गट भाजपकडे आकर्षित होत आहेत.जयंतरावांच्या संवाद दौऱ्यानंतर लागलीच राष्ट्रवादीच्या समर्थकांचे होणारे भाजप प्रवेश स्थानिक नेतृत्वाची डोकेदुखी वाढवणारे आव्हान निर्माण करणारे ठरत आहेत. वाळवा विधानसभा मतदारसंघात जयंतरावांची संवाद मशागत आणि भाजपची पक्षप्रवेश पेरणी गाजत आहे.
महायुतीचा उमेदवार कोण ?
महाविकास आघाडी कडून जयंतरावांची उमेदवारी फायनल आहे. मात्र महायुतीत कलगीतुरा आहे. शिंदेसेनेतून गौरव नायकवडी, आनंदा पवार यांची नावे चर्चेत आहेत. भाजपामध्ये गटबाजीचे ग्रहण आहे. भाजपातून निशिकांत पाटील, राहुल महाडिक, विक्रम पाटील यांची नावे पुढे आहेत. गत निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र भाजपाचे निशिकांत पाटील यांनी बंड केले. आता महायुतीत अजित पवार राष्ट्रवादीची, शिंदे सेनेची भर पडली आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपातमतदारसंघ शिंदे सेना की भाजप कोणाकडे राहील यावरून उमेदवारी ठरेल. मात्र एकास एक उमेदवारीसाठी गटबाजीने ग्रासलेल्या विरोधकात एकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना लक्ष घालावे लागणार आहे.