छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीत राजकारण नको : पोपट भानुसे

आष्टा (डॉ तानाजी टकले )शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा ही शिवभक्तांची मागणी होती. त्यासाठी आम्ही शिव पुतळा संघर्ष समिती स्थापन केली. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले. पुतळा झालाच पाहिजे मात्र शहराला राजकीय स्वार्थापोटी वेठीस धरणारे जयंत पाटील गट, स्व विलासराव शिंदे गट व भाजपा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करू नये, अशी परखड टीका शिवसेना ठाकरे गटाचे वाळवा तालुकाध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे पोपट भानुसे यांनी केली.

पोपट भानुसे म्हणाले, शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यावरून  बरेच राजकीय नाट्य घडले होते. यामध्ये काहींनी फायबरचा पुतळा उभा करून तणाव घडवला. शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा ही शिवभक्तांची मागणी होती. त्यानुसार आष्टा येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. यासाठी संघर्ष समितीच्यावतीने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालया समोर २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळेच जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेस जागा हस्तांतर करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. त्यानुसार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी शिवाजी चौकातील गट नंबर १० ७५ ही दीड गुंठे जागा बगीचा व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ  पुतळ्यासाठी हस्तांतर केली. खरंतर ही जागा संघर्ष समितीचे अॅड. मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील, डॉ विक्रम अनुसे, दीपक आवटी, वीर कुदळे सह समस्त शिवभक्तांनी सलग तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन केल्यामुळेच जागा हस्तांतर झाली होती.

आज पुतळ्यावरून शहरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी एकमेकांवर नेहमी टीका करणारे जयंत पाटील गट, विलासराव शिंदेगट व भाजपा हे एकत्र येऊन आमच्यामुळे पुतळा होत आहे, असा डांगोरा वाजवीत आहेत. ते शिवरायांचे खरे निष्ठावंत मावळे असतील तर त्यांनी आचारसंहिता लागू  होण्याअगोदर महाराजांचा पुतळा पूर्ण करावा. शहरातील समस्त शिवभक्त हे जाणून असुन पुतळ्यासाठी जागा संघर्ष समिती मुळेच मिळाली असल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु स्वतःच्या व राजकीय स्वार्थासाठी,नगरपालिका विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावाला वेटीस धरणारे यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *