महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘ शक्ती ‘ कायदा लागू करावा :‌ प्रतिभाताई पाटील


विटा ( प्रतिनिधी ) : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने तातडीने ‘ शक्ती ‘ कायदा लागू करावा. तसेच बदलापूर, कलकत्ता यासारख्या अत्याचाराच्या घटनातील आरोपींना केवळ फाशीची शिक्षा न देता त्यांना अन्य देशातील शिक्षेसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी केली.

बदलापुरातील अल्पवयीन चिमुर्डींवर झालेला लैंगिक अत्याचार आणि कलकत्त्यातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून झालेल्या भीषण हत्येचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. आज विटा शहरात माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा शक्ती युवती मंच आणि आदर्श शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनींनी जोरदार निदर्शने केली.

विटा :  माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी बदलापूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे, प्रतिभाताई चोथे, लताताई मेटकरी यांच्यासह महिला, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. केवळ बदलापूरच नव्हे तर आज सर्वत्र मुली असुरक्षित झाले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. अशावेळी या गुन्हेगारांना मोकाट न सोडता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रलंबित शक्ती कायदा तातडीने लागू केला पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली.

प्रतिभाताई म्हणाल्या, लैंगिक अत्याचारातील आरोपींना केवळ फाशीची शिक्षा देऊन त्याची जरब समाजाला बसू शकत नाही. तर अन्य देशातील लैंगिक अत्याचाराच्या आरोपींना जशी शिक्षा देण्यात येते तसेच शिक्षा या आरोपींना देण्यात यावी. मुलींच्या संरक्षणासाठी शासनाबरोबरच शाळा, महाविद्यालय आणि पालकांनी देखील जागृत राहिले पाहिजे असे मत प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविद्यालयीन तरुणींनी जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण योजना आणा, अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक फडतरे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे, माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चोथे, लताताई मेटकरी यांच्यासह शेकडो महिला, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *