सांगली ( प्रतिनिधी ) येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या माजी मंत्री, स्व. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दि. ५ सप्टेंबरला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मेळावा होणार असून मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिाकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आदी महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आ. विश्वजीत कदम यांनी दिली.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या पुतळ्याचे कडेगाव येथे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस आ. विश्वजीत कदम, खा. विशालदादा पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, श्रीमती जयश्रीवहिनी पाटील, मा. पृथ्वीराजबाबा पाटील, मा. जितेशभैय्या कदम उपस्थित होते.
आ. विश्वजीत कदम म्हणाले, भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून स्व. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृतीपुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम पतंगराव कदम यानी आयुष्यभर सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी काम केले. पलूस-कडेगाव तालुक्यासाठी ते भाग्यविधाते होते. भारती विद्यापीठासारखी मोठी संस्था त्यांनी उभी केली. राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, शिक्षण, वने, सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली होती. त्याच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यावर स्मारक उभे केले आहे. त्या ठिकाणी स्व. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. याचे अनावरण दि. ५ रोजी सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिाकार्जुन खर्गे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मेळावा होणार आहे. या मेळाव्याला दोन लाख लोक उपस्थित राहतील. पावसामुळे येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडपची व्यवस्था देखील केली असल्याचे आ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी खा. विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आदी उपस्थित होते
विधानसभेचा नारळ फुटणार : सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सहयोगी सदस्य खासदार विशाल पाटील यांनी बाजी मारल्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्वच दिग्गज नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित राहणार असले तरी यानिमित्ताने जिल्ह्यात विधानसभेचे रणसिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.