कवठेमहांकाळ ( प्रतिनिधी ) : कवठेमहांकाळ शहरात कोणताही धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. अशाच पद्धतीने यंदा विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमात आगामी विधानसभा आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बीजे रोवत नेतृत्वाचं मार्केटींग करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते.
विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नेतृत्व सिद्ध करण्यासाठी युवक नेत्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवत नेतृत्वाचं मार्केटींग सध्या शहरात जोरात सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी कार्यक्रमातून याची झलक शहरवासियांना पहावयास मिळाली. युवक नेत्यांनी सुरु केलेल्या या मार्केटींगच्या फंड्याला शहरवासियांतून मात्र उदंड प्रतिसाद लाभला.
माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पुत्र प्रभाकर पाटील चा चेहरा विधानसभेसाठी पुढे केला असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पहिल्याच दणक्यात प्रभाकर यांना आमदार करायचंच, या ईराद्याने संजय पाटील यांची झाडून सारी यंत्रणा कामाला लागली दिसत आहे. नुकतीच प्रभाकरच्या युवा शक्तीने कवठेमहाकाळ जवळील एस एम हायस्कूल जवळ दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं. विशेषतः यावेळी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जोरदार प्रतिसाद दिला.यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाच सुरुवात केल्याचे दिसते.
दुसऱ्याबाजूला युवानेते रोहित पाटील यांनी कर्तव्य पदयात्रा व सांगता सभा शिरढोण ते मळणगाव येथे काढली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. एकुणच या कार्यक्रमातून नेतृत्वाचं शक्तीप्रदर्शन आणि मार्केटींगही पहायला मिळालं.
त्यामुळे तासगाव कवठेमंकाळच्या विधानसभेची दहीहंडी युवा नेते रोहित पाटील फोडणार की प्रभाकर पाटील फोडणार याची सध्या चर्चा सुरू आहे.
गणेशोत्सवालाही राजकीय रंग..
दहीहंडीनंतर अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या उत्सवातही निवडणुकीचेच रंग पहायला मिळणार आहेत. या माध्यमातून अनेक युवा वर्गाशी कनेक्ट रहाण्याचा प्रयत्न विधानसभेसह महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून केला जात आहे.