विटा ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव पाटील यांनी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग या सर्व क्षेत्रात आदर्शवत काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून एक सुशिक्षित उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. वैभव पाटील हे मतदार संघाला नवीन दिशा देण्याचे काम करतील, अशी ग्वाही माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी दिली.
बोरगाव तालुका तासगाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील बोलत होते.
सदाशिवभाऊ पाटील म्हणाले, विरोधक केवळ टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवत आहेत. परंतु कर्तुत्व काय असते हे वैभव पाटील यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून दाखवले आहे. नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना त्यांनी नगरपालिकेला देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विटा शहराच्या इतिहासात एक वेगळीच नोंद केली आहे. त्यांचा पारदर्शक कारभार पाहून विट्यातील जनतेने त्यांना पुन्हा मतदार संघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवावेत यासाठी त्यांनी उमेदवारी करावी असा आग्रह होता. म्हणून आम्ही सर्वांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या कर्तत्वातील धमक पाहूनच त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की ते याचे सार्थक नक्की करतील.
यावेळी माजी सरपंच के. जी. अण्णा पाटील, क्रांती कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, आळते सोसायटीचे चेअरमन मधुकर पाटील, विटाअर्बन चे संचालक चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नागरिक रामराव पाटील, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.